उपासना - नित्य व नैमित्तिक

उपासना म्हणजे आपल्या उपाख्य देवताच्या जवळ असणे होय. परमपूज्य सद्गुरू श्री. विश्वचैतन्य शनैश्वर स्वामींच्या जवळ उपासनेद्वारे रहाण्यासाठी चार मार्ग आहेत. (1) कायिक उपासना, (2) वाचिक उपासना, (3) मानसिक उपासना (4) आर्थिक उपासना. आपण यातील आपणास शक्य आहे तितक्या मार्गाने उपासना करावी.
या उपासना मार्गांमध्ये साधारण कुठच्या कुठच्या गोष्टी येतील हे खाली सांगतच आहे. परंतु कुणाला प्रश्न पडेल की हे चार मार्ग किंवा अधिकही सुचणारे काही मार्ग कशाकरता हवेत? तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वामीजींच्या प्रत्यक्ष जवळ असणे जितके आवश्यक आहे तितकेच मनानेही जवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वामीजींच्या रुपाने क्रियाशील असणाऱ्या उर्जेशी आपण आपल्या मनाद्वारेच संपर्क साधू शकतो. तो मानसिक संपर्क ठेवण्याची सतत जाणीव होण्यासाठी म्हणून उपासना मार्ग उपयोगात आणणे आवश्यक आहे.

(1) कायिक उपासना
(1) उपासनेचे साहित्य घरोघरी वाटणे.
(2) प्रार्थना सभांचे आयोजन करणे.
(3) नामपत्रकांचे वाटप करणे.
(4) कार्यासाठी आवश्यक ती मदत गोळा करणे.
(5) कार्यक्रमाची माहिती देऊन लोकांना येण्याची सुचना देणे.

(2) वाचिक उपासना
(1) श्री. विश्वचैतन्य शनैश्वराय नमः मंत्राचा गजर करणे.
(2) श्री. विश्वचैतन्य शनैश्वर स्वामींशी संबंधित निरनिराळया स्तोत्रांचे नियमित वाचन व प्रार्थना करणे.
(3) शक्य असेल तेव्हा स्तवन व स्तोत्रांचे 21, 51, 101 किंवा त्याहून अधिक पठण, नामगजर 11,000, 21,000 किंवा 51,000 किंवा त्याहूनही अधिक, एकटयाने किंवा सामुदायिकरित्या करावा.
(4) सतत मुखाने नामस्मरण करत रहाणे.

(3) मानसिक उपासना
(1) रोज किमान अर्धा तास श्री. विश्वचैतन्य शनैश्वरस्वामींच्या स्वरुपावर दृष्टी स्थिर करावी.
(2) रोज अर्धा तास तरी डोळे मिटून श्री. विश्वचैतन्य शनैश्वर स्वामींचे स्मरण करावे.
(3) मनातल्या मनात स्तवन व स्तोत्रांचे पठण करत रहावे.
(4) सामुदायिक प्रार्थना सभेस नियमित उपस्थित रहावे.

(4) आर्थिक उपासना
(1) जेव्हा जेव्हा जसे जसे शक्य असेल त्याप्रमाणे श्री. विश्वचैतन्य शनैश्वरस्वामींना धनराशीच्या वा वास्तुरूपाने समर्पित होणे.
(2) आपली नोकरी, व्यवसाय, धंदा यांच्या उत्पन्नापैकी ठराविक भाग श्री. विश्वचैतन्य शनैश्वर स्वामींना नियमितपणे समर्पित करणे.
(3) श्री. विश्वचैतन्य शनैश्वर स्वामींच्या प्रेरणेने संस्थेच्या चालणाऱ्या निरनिराळया उपक्रमात धनराशी समर्पित करणे.
या उपासना मार्गामध्ये आपण जेव्हा कायिक उपासना कराल तेव्हा आपणास स्वामीजींच्या बद्दल त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या विचाराबद्दल अनेकजण अनेक प्रश्न विचारतील. अर्थात त्या प्रत्येकाशी स्वामीजींबद्दल बोलताना आपोआपच आपल्याकडून स्वामीजींचे स्मरणही होईल व त्यांच्याबद्दलची मनाची श्रध्दायुक्त धारणाही पक्की होईल.
वाचिक उपासना करतानाही आपण जप कराल, स्तोत्र वाचाल तर आपल्याला मानसिक आनंद, मनोबल हे मिळेलच पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील आपल्या आसपासचे लोकही माहिती घेतल्याशिवाय रहाणार नाहीत. जर आपण सामुदायिकरित्या स्तवन, स्तोत्र व नामस्मरण असा काही कार्यक्रम केला तर ज्यांना आपण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बोलवाल तेही तुमच्याकडून माहिती घेतल्याशिवाय रहाणार नाहीत. आपोआपच याद्वारे आपण स्वामीजींच्या सतत मानसिक संपर्कात राहाल.
मानसिक उपासना करतानासुध्दा निरनिराळया प्रकारे मनाने श्री. स्वामीजींच्या सहवासात कसे रहावे हेच सांगितले आहे. आणि आर्थिक उपासनेतही परमपुज्य श्री. विश्वचैतन्य शनैश्वर स्वामीजींच्या भक्तांनी सतत त्यांचे स्मरण करावे हा दृष्टीकोन आहे. भक्त जेव्हा स्वामीजींना कुठलीही गोष्ट समर्पित करू इच्छितात तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीची तजवीज करणे हे ओघाने आलेच म्हणजेच संकल्पापासून ते पूर्ततेपर्यंत सतत स्वामीजींची आठवण ही राहणारच. यातून मानसिक उर्जा मिळेलच. त्याचबरोबर स्वामीजींच्या कार्यात सहभागी होण्याचा आनंदही मिळेल.