प्रस्तावना

आपल्या शरीराला शक्ती हवी असेल तर आपण अन्न, पाणी, निवारा, विश्रांती हे आवश्यक मानतो व ते मिळवण्याचे मार्ग शोधतो. सतत कष्ट व संघर्ष करता करता कधीतरी जाणीव विकसित होत जाते की माझ्या शारिरीक, आर्थिक, बौध्दिक क्षमतेच्या पलिकडे काही आहे व माझ्या आणि कुटुंबाच्या प्रगतिसाठी त्याची साथ असणे आवश्यक आहे. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा फक्त आपल्या मनातूनच जातो. या मनाच्या मार्गाने जाऊन त्यांच्या जवळ स्थिर होण्याचा प्रयत्न करणे यालाच श्री. विश्व चैतन्य शनैश्वर उपासना असे म्हणतात. रोजच्या रोज आपण ज्याप्रमाणे स्नान, भोजन, व्यायाम, विश्रांती इत्यादी गोष्टी करून शरीर सक्षम ठेवतो. त्याचप्रमाणे आपली आत्मशक्ती सक्षम ठेवण्यासाठी आपल्याला स्मरण, प्रार्थना व समर्पण भावना जागृत ठेवणे आवश्यक आहे. हीच महत्त्वाची गोष्ट प्रत्येक दिवशी समर्पण भावनेने श्रीविश्वशनैश्वर स्वामींचे केलेले त्रिकाल प्रार्थना व स्मरणाद्वारे साध्य होते. त्रिकाल प्रार्थना म्हणजे (1) प्रातःकाल (2) माध्यान्ह काळ (3) सायंकाळ. या तीनही वेळला केलेली प्रार्थना (प्रार्थनेचा क्रम व पध्दत) या पध्दतीने रोज किमान 3 वेळा प्रार्थना करावी व सकाळी जागे झाल्याबरोबर, रात्री झोपण्याअगोदर व दोन्ही वेळेला भोजनापूर्वी म्हणण्याचेसाठी सांगितलेले श्लोक म्हणावेत. त्याने स्मरण होते. यालाच आपण नित्य उपासना म्हणजे दैनंदिन उपासना असे म्हणतो.
भोजनाच्या अगोदर करण्याची प्रार्थना करण्याने पुढील कृती ही तोंडात अन्न कोंबण्याची प्रक्रिया न होता शरीराच्या योग्य पोषणासाठी योग्य मानसिकतेत केलेले अन्नग्रहण होते. झोपण्याअगोदर करण्याच्या प्रार्थनेने मनातील अनावश्यक विचार दूर होऊन मनाची अवस्था सकारात्मक होईल व सकाळची प्रार्थना केल्याने दिवसाची सुरुवात आनंददायक होईल.
नैमित्तिक उपासना म्हणजेच सामुदायिक उपासना. यात आपल्याबरोबर इतरही काही जणांचा सहभाग असतो. सामुदायिक नामस्मरण, सामुदायिक प्रार्थना सभा अनेक निरनिराळे होणारे कार्यक्रम व उत्सव हे काहीतरी निमित्ताने होतात म्हणून आपण त्याला नैमित्तिक उपासना असे म्हणतो. सामुदायिक उपासनेत आपल्याबरोबरच इतरही काही उपासक सहभागी झाले आहेत हे पाहिल्यावर साहजिकच आपला उत्साह वाढतो. श्री. विश्वचैतन्य शनैश्वर स्वामींच्या केल्या जाणाऱ्या नित्य उपासना किंवा नैमितिक उपासना यामध्ये सगळयात महत्त्वाचे आहे ते म्हणजे तुमच्या मनातून उठणारे सकारात्मक भावनांचे शक्तिशाली तरंग. जे तुम्हाला श्री. विश्वचैतन्य शनैश्वर स्वामींशी मनाने जोडतात व त्याद्वारे तुम्हाला मिळणाऱ्या अखंड उर्जेचा तुम्ही तुमच्या भोवतीच्या वातावरणात योग्य व सकारात्मक बदल घडवण्यासाठी वापर करू शकता. या उर्जेद्वारे श्री. विश्वचैतन्य शनैश्वर स्वामींच्या कृपेने आपण आपले दैनंदिन जीवन व कामे यांना व आपल्या भोवतीच्या वातावरणाला सकारात्मक दिशा देऊ शकता. परंतु अनेक वेळा काही भक्तांना विशेष बदल हवा असतो. विशेष यश हवे असते तेव्हा त्यासाठी विशेष प्रयत्नांचीही आवश्यकता असते. विशेष नियोजनाची आवश्यकता असते. जसे तुम्ही वृक्षारोपणासाठी खड्डा खणायचा असेल तर ती कृती सहज कराल परंतु इमारतीचा पाया घ्यायचा असेल तर विशेष काळजी घ्याल तुम्हाला तासा दोन तासांचा प्रवास करावयाचा असेल तर त्याचे नियोजन सहज कराल परंतु परदेशी जायचीे असेल अथवा देशातच अनेक दिवसांचा प्रवास असेल तर विशेष नियोजन कराल. आपल्याला कामाच्या अथवा व्यवसायाच्या ठिकाणी जावयाचे असेल तर आपण बऱ्यापैकी तयार होतो व चांगले कपडे वापरतो किंवा चांगला पहेराव करतो. घरात वावरायचे असेल किंवा बाहेर फिरायला जायचे असेल तर साधे कपडे परिधान करतो व बाहेर पडतो. परंतु जर लग्नकार्याला जावयाचे असेल, विशेष देवदर्शनाला जावयाचे असेल किंवा इतर काही विशेष कार्य असेल तर आपण आपल्या दिसण्याची व पहेरावाची विशेष काळजी घेतो. ज्याप्रमाणे आपणास जो परिणाम साधावयाचा आहे त्यासाठी आपण उर्जेचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे भोवतालची परिस्थिती, सहकाऱ्यांची मनस्थिती, काम देणारे, काम करून घेणारे इत्यादी सर्वांच्या परिस्थितीत बदल सकारात्मक बदल घडविण्यासाठी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा, मनस्थितीचा अभ्यास विशेष कष्ट घेऊन करावा लागतो जसे - आपल्या गरजा आपले आईवडील पुरवीत असतात. परंतु जेव्हा आपणाला एखाद्या विशिष्ट गोष्टीची अपेक्षा असते तेव्हा आपण त्यांची मनःस्थिती, सभोवतालची परिस्थिती या सर्वांचा विचार करून ती गोष्ट मागतो. कारण ती आपली विशेष मागणी असते आणि म्हणूनच त्यासाठी आपण विशेष कष्ट घेतो. देवदर्शन, सद्गुरूदर्शन घेताना आपण आपला आदरभाव, प्रेम हे व्यक्त करतोच. तेथे जे काही समर्पित करणे शक्य आहे ते करतोच. पण जेव्हा आपल्याला एखादी मागणी विशेषत्वाने करावयाची असते तेव्हा आपण असे सांगतो की, ही विशिष्ट गोष्ट माझ्यासाठी घडावी त्यासाठी मी इतक्या नारळाचे तोरण बांधेन, अमूक एक निधी समर्पित करेन, इतक्या लोकांना अन्नदान करेन! या गोष्टी आपण रोज करत नाही. जेव्हा आपल्याकडे विशेष लक्ष आकर्षुन घेण्याची गरज आहे असे वाटते तेव्हाच असे संकल्प आपण करतो. यालाच नवस असे म्हणतात. श्री. विश्वचैतन्य शनैश्वर उपासनेत याला विशेष उपासना असे म्हणतात. या विशेष उपासनेसाठी श्री. विश्वचैतन्य शनैश्वर स्वामीजींद्वारे मिळणारी विशेष प्रार्थना असेल अथवा एखादी त्यांनी स्पर्श केलेले यंत्र असेल, मंत्र असेल यातील ज्याचा ज्याचा उपयोग तुमच्या विशेष उपासनेसाठी करणे आवश्यक असेल त्याप्रमाणे ते तुमच्यासाठी योजना करतील. या विशेष उपासनेचा लाभ घेतानाच त्यासाठी उपासकांनी विशेष सेवाही करावयाची आहे. ती सेवा कोणत्या स्वरुपात व कधी करावी हे श्री. विश्वचैतन्य शनैश्वरस्वामी स्वतःच आपल्याला सांगतील.
ह्या सगळयाची अधिक माहिती व स्वामीजींचे वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण आम्हाला आमच्या संपर्क क्रमांकाशी अथवा इ-मेल पत्त्याच्या आधारे संपर्क साधल्यास स्वामींच्या वेळेची उपलब्धता व आवश्यक ती सर्व माहिती मिळू शकेल.