प्रार्थना साहित्य

त्रिकाल प्रार्थना

सकाळी उठल्यावर करायची प्रार्थना
नमो सूर्यपुत्रा तुझी दिव्य कीर्ती ।
शनी रूप विश्वेश चैतन्यमूर्ती ।।
तुला आठवूनी सूर्या स्तवावे ।
प्रभाते तुझे रूप चिंतीत जावे ।।१।।
झाली प्रभात नमितो तुझिया पदाला ।
श्री विश्वचैतन्यशनैश्वराला ।।
गेला लयास तम अन् नभी सूर्य आला ।
पसरो प्रकाश मनी अन् दावी पथाला ।।२।।

दुपारी / रात्री जेवणाच्या आगोदर करायची प्रार्थना

घेतो मुखी कवळ अन् स्मरतो तुम्हाला ।
श्री विश्वचैतन्यशनैश्वराला ।।
देई आरोग्य क्षमता उर्जा तनाची ।
देई अखंड लक्ष्मी उर्जा मनाची ।।१।।
देई सदैव मजला सुग्रास अन्न ।
करी तू सदैव विजयी अन् विश्वमान्य ।।
देई कृतज्ञ प्रेमा सहजीवनात ।
दुरिता हरोनी रक्षी जनजीवनात ।।२।।

रात्री झोपण्यापूर्वी करावयाची प्रार्थना

लाभो सुखात निद्रा स्मरुनी पदाला ।
भरू दे अखंड उर्जा तन अन् मनाला ।।
लाभो मनास शांती शरीरा आरोग्य ।
होवो प्रभात समयी कार्यास योग्य ।।१।।
ना ध्यान ना ज्ञान नाही तपस्या ।
ना पुण्य ना मान सार्‍या समस्या ।।
हे सारे असूनी धरिसी तू हृदया ।
नमो विश्वचैतन्यशनिदेवाराया ।।२।।

श्री विश्वचैतन्यशनैश्वर संकट निवारण स्तोत्र

हे विश्वचैतन्यरूपी परमेश्वरा मज दिनांवारी दया करा।
जीवन नौका तारण करा पार करावया भव सागरा।।१।।

तुम्ही तारिले अनेकांसी ज्यांनी धरीले विश्वासासी।
चरणी वरिले अनन्य भावासी त्या सर्वांना रक्षिले।।२।।

जो भक्त तुमचे करील स्मरण तो असेल त्यांचा भाग्याचा क्षण ।
अंधार सारा जाईल पळून जीवन उजळले हो त्यांचे।।३।।

तुमचे स्वरूप चित्ती धरा अविरत तुमची सेवा करा।
आनंद नांदेल अविरत घरा तुमच्या कृपेने सर्वदा।।४।।

ज्याच्या मनी जैसा भाव तैसाच पावेल शनी देव।
विश्वचैतन्य त्याचेच नांव हा विश्वास भक्तांचा।।५।।

जे जे तुम्हा शरण आले पीडा रोग त्यांचे हरिले।
जीवन त्यांचे धन्य झाले तुझ्या कृपेने सर्वदा।।६।।

हे विश्वचैतन्यशनैश्वर देवा मी ही करितो तुमचाची धावा।
मज वाचवूनी कृपा हस्त द्यावा पीडा निवारी दासाची।।७।।

सर्वांस लागो तुमचाची ध्यास सारे सुखी हो मनी हीच आस।
ईच्छा सदैव घडू दे तुमचीच सेवा वर हाच द्या श्री विश्वचैतन्य देवा।।८।।

श्री विश्वचैतन्यशैनेश्वर स्तवन

जय जया जी गणनाथा । सकल विद्यांचा दाता ।।
देई देई शब्द सामर्थ्य । वंदितो मी मनोभावे ।।१।।
शब्दांची करुनी उधळण । करू जाणे सद्गुरू स्तवन ।।
त्या स्तवनाचे करुनी कवन । सुख शांती जना लाभो ।।२।।
हे आई कुलदेवते । साष्टांग नमोस्तुते ।।
दे मज शुद्ध मते । सद्गुरुनाथ स्तविण्या ।।३।।
हे गुरुराया विश्वेश्वरा । नमितो त्या सर्वेश्वरा ।।
शुभ चिंतनास परा । स्तवन हे सफळ होवो ।।४।।
सामर्थ्य तव अपरंपार । तरुनी जाती सारे पामर ।।
भवसागर सहजची पार । होई स्मरता तुज ।।५।।
ध्यान धरा, सेवा करा । हाचि तव उपदेश खरा ।।
आनंदाचा अखंड झरा । सहजची मिळे आचरिता ।।६।।
सेवा भावी कर्म करा । नका गुंतू त्यात जरा ।।
हा तव बोध खरा । एक एक जनास ।।७।।
अंगी आणा बळ । त्यात मुळीच न खळ ।।
नेत्र करा निर्जळ । हा ही बोध तुझा ।।८।।
कित्येकांचे संसार तरले । कित्येक आनंदात उरले ।।
कित्येकांचे अज्ञान सरले । मार्गदर्शनाने तुझिया ।।९।।
दु:ख येवो वा सुख । हंसते राहो सदा मुख ।।
कधी कुणी ना दुर्मुख । भक्तगण तुझा ।।१०।।
करा जन हो धर्मप्रेम । करा जन हो देशप्रेम ।।
दाविला हाची नेम । भक्तगणांस तुझीया ।।११।।
करा अभ्यास लेखनाचा । तसाच करा भाषणांचा ।।
आणि व्यक्ती व्यक्तीचा । हा ही बोध तुझा ।।१२।।
व्यक्ती व्यक्ती व्हावी ज्ञानी । व्यक्ती व्यक्ती व्हावी मानी ।।
आणि व्हावी तशीच दानी । हे तुझे सांगणे आंम्हा ।।१३।।
जे जे तुझ्या पायी आले । ते ते ज्ञान संपन्न झाले ।।
दैन्य त्यांचे पळून गेले । बोधामृताने तुझीया ।।१४।।
प्रदर्शन नको भक्तीचे । तसेच नको ते शक्तीचे ।।
आचरण सदा युक्तीचे । यथार्थ तव सांगणे ।।१५।।
देह ज्ञान वाढवा । मनो रुग्णता झडवा ।।
आणि आळस बुडवा । हा ही बोध तुझा ।।१६।।
चमत्कारास नमस्कार हा कुठला व्यवहार? ।।
अंधतेवर कुठार । सदाच असे तुझा ।।१७।।
निसर्ग नियमांचे ज्ञान । त्यातच आसे विज्ञान ।।
याहून वेगळे का ज्ञान । भूतलावर या असे? ।।१८।।
जे जे प्रिय आपणास । ते ते प्रिय इतरांस ।।
हा जाणा खरा कस । अध्यात्म विज्ञानाचा ।।१९।।
एक ज्ञान आध्यात्माचे । एक ज्ञान ते आत्म्याचे ।।
बोल तुझे हे सच्चे । वंदितो मी गुरुराया ।।२०।।
नियम सारे अध्यात्माचे । आणि तसेच लौकीकाचे ।।
नका लावू,याला त्याचे । हेच तुझे सांगणे ।।२१।।
श्रद्धा ठेवा सदैव दृढ । त्यात नको कधीच तेढ ।।
येवो उतार वा चढ सदा । निश्चळ असा, हे सांगणे ।।२२।।
हे विश्वचैतन्यशनैश्वर । श्री ब्रह्मा विष्णू महेश्वर ।।
तुमच्या स्वरूपाचा पार । कैसा कोण लागेल? ।।२३।।
जैसे तुमचे आंम्हा सांगणे । तैसेच हो तुमचे वागणे ।।
आणि तैसेची हो देणे । भक्तास भरभरून ।।२४।।
कैसे कुणाशी वागावे । आणि कैसे जीवन जगावे ।।
राग लोभ कैसे त्यागावे । हा बोध गुरूंचा ।।२५।।
विविध समस्यांची उकल । आणि अशुभाचा निकाल ।।
ज्ञानानंदाचा सुकाळ । आहे विश्वेश्वरा पायी ।।२६।।
एक वेगळी ध्यान पद्धती । एक वेगळी शुभमती ।।
एक वेगळीभाक्तसंगती । आहे सद्गुरू ठायी ।।२७।।
एक वेगळे विश्वात्मक मन । एक वेगळे राष्ट्रप्रेम ।।
एक वेगळे आनंदनिधान । नांदतसे एकाच ठायी ।।२८।।
जन, ईश, सेवा करा । प्राणियांस उरी धरा ।।
खग वनांचे शुभ स्मरा । हाचि बोध गुरूंचा ।।२९।।
कार्य गुरुंचे विश्वोद्धार । आणिक तैसे आत्मोद्धार ।।
करू लागा हो उद्धार । स्वतःचा अन् राष्ट्राचा ।।३०।।
कित्येक अनुभव गाठीशी । आणि आशिष तव पाठीशी ।।
मग भीती कुणाची कशी । बाळगावी भक्तांनी ।।३१।।
स्तवनावारी या विश्वासून । जो करेल आचरण ।।
तो जगेल क्षणोक्षण । आनंदाने अत्यानंदाने ।।३२।।
कवनात दडले गुरुज्ञान । आणि आहे विज्ञान ।।
ही आहे शांतीची खाण । जाणा हे सर्वथा ।।३३।।
जो वागेल या अनुसार । आणिक करेल जो प्रसार ।।
त्यास प्रसन्न सुरवर । निश्चित पै होतील ।।३४।।
स्तवन तुमचे कैसे करू? । किति किती तुला स्मरू ।।
दिलेस सर्व अपरंपारु । मज सारख्या मुढमतीस ।।३५।।
कष्ट हरती तत्काळ । आणि शांतीचा सुकाळ ।।
असे कवनाचे फळ । सदा सर्वदा लाभेल ।।३६।।
वाचक होईल मोदीत । निरक्षक होईल उदित ।।
कवनात या निश्चित । सामर्थ्य असेच वसे ।।३७।।
या कवनातील जे जे उणे । ते ते या मुढाचे देणे ।।
मात्र अत्यानंदाचे लेणे । ज्याचे त्याचे ।।३८।।
जनकल्याणाची आस धरुनी । विश्वशांतीची आस धरुनी ।।
सद्गुरू रूप चित्ती धरुनी । लिहिले हे पंच अष्टक ।।३९।।
इति श्री स्वस्ति श्री कवनाची । करितो भक्त हाचि ।।
आस धरुनी जनकल्याणाची । मोहन गोरक्षक हा ।।४०।।

समर्पणाची प्रार्थना

हे अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरू श्री विश्वचैतन्यशनैश्वर महाराज,
मी आपणास स्मरून, साक्षी ठेऊन, आवाहन करून नम्रतापूर्वक असे सांगतो की,
आपण माझ्या मनात व आत्म्यात प्रवेश करा व मला आशीर्वादित करा.
माझ्या कुटुंबियांच्या मनात व आत्म्यात प्रवेश करून त्यांनाही आशीर्वादित करा.
माझ्यात व कुटुंबियांमध्ये प्रेम, सहकार्य व संघटितपणाची भावना वाढीस लागून
त्याद्वारे आम्ही एकमेकांना आनंद देऊ असा आम्हाला आशीर्वाद द्या.
आपणच मला योग्य मार्गावरून न्याल व योग्य जीवनासाठी लागणारे
आवश्यक ते बदल घडवून आणल याची मला खात्री आहे. जीवनातील प्रत्येक
आनंदाच्या आणि दु:खाच्या क्षणी आपण मला सांभाळाल व मानसिक समतोल
ठेवण्यास मदत कराल याची मला खात्री आहे.
मी आपणास समर्पित आहे. आपण सदैव माझ्याबरोबर आहात.
कुठल्याही संकटावर, दु:खावर, पराभवावर मी मात करेन व विजयीच होईन याची मला खात्री आहे.
आपण केलेल्या कृपादृष्टीतून उतराई व्हावे म्हणून
कृतज्ञता व्यक्त करण्यसाठी मी तन, मन, धनाने
आपल्या कार्यात सहभागी व्हावे व तशी मला, सद्बुद्धी व्हावी असा मला आशीर्वाद द्या.
आपली कृपा, आशीर्वाद व मार्गदर्शनाने मी निर्भय आहे.
मी आपला आभारी आहे, कृतज्ञ आहे.