कल्पवृक्ष - एक प्रार्थना विज्ञान

मनोगत :-
मी शैलेश देशमुख, अननोन वॉटर्स कंपनीचा प्रमुख म्हणून आज आपण विशेषत: आय.टी. कंपन्यांमधून मला ओळखता. मी मध्यमवर्गीय घरामध्ये जन्माला आलो, पुण्याच्या एस.पी. कॉलेजमध्ये शिकलो तेव्हा कॉलेजच्या सांस्कृतिक जगात टॉपला राहिलो. कॉलेज संपले, व्यवहारी जगात आलो, कारखाना सुरु। केला आणि जो आर्थिक नुकसानीच्या खड्ड्यात उतरलो, तो खड्डा मोठा मोठा होत गेला व कर्जबाजारी झालो. कर्ज, अपमान, मनस्ताप, वैफल्य हे चक्रवाढ व्याजासारखे वाढतच चालले. भविष्यात पूर्ण अंधार असल्याची खात्री होत असतानाच कॉलेजमधला वर्गमित्र श्री. पराग आगटे सहज बोलता बोलता श्री. विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींबद्दल बोलला त्याच्या म्हणण्यानुसार सध्याच्या बाबा, महाराज किंवा स्वामी आणि स्वत:ला अध्यात्मिक अधिकारी म्हणवून लोकांसमोर येणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्तीमत्व व वर्तणूक या संकल्पनेला श्री विश्वचैतन्य स्वामींना भेटल्याने धक्काच बसतो. मी माझ्या या अडचणींचा पाढा परागसमोर वाचला व त्याने मला श्री विश्वचैतन्य स्वामींना भेटण्याचा सल्ला दिला. त्यांची माझी भेट झाली त्याला आता जवळजवळ पाच वर्षे होतील.

त्यांच्या भेटीपासून ते मी अननोन वॉटर्स सारखी कंपनी स्थापन करून ती यशस्वीपणे चालविणे, सर्व प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर येणे व समाजात पुन्हा सन्मान प्राप्त करणे हा एका मोठ्या कादंबरीचाच विषय होईल. यथावकाश मी ते सर्वांना सांगेनच परंतु आजचा विषय निराळा आहे. आदरणीय स्वामीजींनी मला निरनिराळया संकटातून बाहेर पडण्यासाठी जे मार्गदर्शन केले, ज्या प्रार्थना करावयास सांगितल्या त्याबद्दल मी स्वामीजींचे मार्गदर्शन घेणारया इतर सहकाऱ्यांची चर्चा केल्यावर व त्यांनीही स्वामीजींच्या अध्यात्म विद्न्यानाद्वारे आलेले अद्भूत पण सत्य अनुभव सांगितले त्यामुळे मला असे मनापासून वाटले की, या द्न्यानाचे दरवाजे साऱ्या जगासाठी उघडले तर साऱ्या जगाचेच कल्याण होईल. हे करण्याअगोदर मला आदरणीय स्वामीजींची परवानगी आवश्यक वाटली. मी परवानगी मागीतली आणि ते म्हणाले ` तू सद्भावानेने व लोककल्याणासाठी हे करणार असशील तर माझी काहीच हरकत नाही` मला परवानगी मिळाली आणि आता आपण पुढील विषयाकडे वळूया.