आपले सदगुरु

श्री विश्वचैतन्य शनैश्वर महाराजश्री विश्वचैतन्य स्वामींनी जेव्हा आपले अध्यात्मिक कार्य सुरु केले तेव्हा त्यांच्या भोवती जमलेल्या कार्यकर्त्यांनी `श्री विश्वचैतन्यशनैश्वरमहाराज उपासना व सेवा प्रतिष्ठान' या संस्थेची स्थापना केली. हिन्दू समाजाला जातीपातीच्या, उच्चनीच, स्त्री-पुरुष, लहान-मोठा असल्या चुकीच्या विचारातून बाहेर काढून परमेश्वर सर्वांसाठीच आहे या विचारांचा त्यांनी प्रचार केला व समाजातील अनेकांनी तो स्वीकारलाही! स्वामीजी विश्वबंधुत्वासाठीही कार्य करीत आहेत. या सर्वांचा साकल्याने विचार करूनच विश्वचैतन्यशनैश्वर उपासना सेवा कार्याची संकल्पना आकारास आली. सकारात्मक समाजाची निर्मिती तेव्हाच होऊ शकते जेव्हा प्रत्येक व्यक्ती सकारात्मक होते.
प्रार्थनेचे विज्ञान म्हणजे विश्वमनाशी अंतर्मनाद्वारे संवाद साधण्याचे विज्ञान होय. हे विज्ञान आपल्या उत्कर्षासाठी श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींनी उपलब्ध करून दिले आहे आणि म्हणूनच आपण त्यांना कल्पवृक्ष अध्यात्म विज्ञानाचे जनक म्हणतो. ज्यांना श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने याचा वापर करावयाचा आहे, त्यांनी श्री विश्वचैतन्यशनैश्वर स्वामींचे स्मरण करून, त्यांच्या नावानेच प्रार्थना करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे तांब्याची तार हि विजेची वाहक आहे, हवा हि ध्वनीची वाहक आहे त्याप्रमाणे मन हे भावनेचे, श्रद्धेचे वाहक आहे. त्याद्वारे तुम्ही स्वतः श्री स्वामिजींशी सलग्न होऊ शकता. साधकांनी श्री स्वामिजींशी सलग्न होण्याच्या या प्रक्रियेला व त्याद्वारे साधकांनी प्रगत होण्यालाच श्री स्वामीजी उपासना असे म्हणतात.